
कुठल्यातरी एका अदभूत ओढीने वयाची मर्यादा विसरून,
मोठ्या हुरूपाने त्या गगनभेदी कीर्तनात स्वतःला
झोकून देणारे ते वारकरी, ज्यांच्या नसानसातून एक चैतन्याची शक्ती वाहत होती.
खरेच कुठली अशी ही अजब शक्ती जी कुंडलिनी शक्तीच्याही वरचढ असणारी, कुठल्याही योगीपुरुषाला हवीहवीशी वाटणारी, कुठल्याही तांत्रिकाला पायचीत
करणारी, क्षणार्धात काळ्या शक्तींना धूळ चाखवणारी आणि मनातील सकारात्मकता इतकी प्रबळ करणारी
की ज्यामुळे माणसाने स्वतःचे भानच हरपून जावे
आणि थेट भगवंताशीच गाठ बांधावी.
खरेच अशी कसली ही अदभूत ओढ, आणि कोण हा विठ्ठल ? कोणी खरेच कधी कुठे पहिला आहे का? दंतकथा म्हणावी तरी कशी, विक्रम वेताळाची, हातिमताई, ह्यांच्या कथा पण सर्वप्रचलित,
पण त्यांचा कोणी एवढा उदो उदो केलेला मी तरी नाही पहिला.
एवढेच काय देवांचा देव इंद्रदेव, ह्याचाही इतका
उदो उदो मला तरी नाही दिसला.
पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश ह्यांच्या
तर अस्तित्वाचा ठोस पुरावा आहे, पण ह्या पंचमहाभूतांपैकी कोण्या एकाचा असा दिव्य सोहळा
मी तरी नाही पहिला.
एवढी हुशार ही
जनता मला तरी
वाटत नाही की
एका दंतकथेवर विश्वास
ठेऊन असेल. इतक्या
मोठ्या जनसमुदायाला भुरळ पाडून शेकडो किलोमीटर
पायी चालण्यास उत्सुफूर्त
करणारा हा विठ्ठल
मला तरी वाटत
नाही की एखाद्या
दंतकथेचा नायक आहे
म्हणून.
जसा आगळा वेगळा सावळा हा विठ्ठल तसेच आगळे वेगळे त्याचे हे भक्त वारकरी.
आषाढी कार्तिकेला वारी करणारे हे वारकरी मला तर कस्तुरीप्रमाणे भासत होते, कुठलेही ठिकाण असो, अन्यथा कसलीही परिस्थिती, कशाचीच चिंता न करता अखंड हरिनामाचा सुगंध ते चौफेर उधळीत होते.

त्यांच्या ह्या वारीत,
अशी कुठली स्पर्धा
नव्हती , की कुठले
असे विशेष ध्येय
, कुठला सखोल असा
पुराणांचा अभ्यास ही नव्हता, की
कुठली अशी योजना,
खरेतर ते वारी
स्वतःसाठी करीतच नव्हते.
ज्या
थेंबाला हे माहीत
आहे की जरी
तो नदीत पडला
काय किंवा नाल्यात
त्याला आज नाही
तर उद्या समुद्राला
मिळायचेच आहे त्याला
कशाला लागते ती
स्पर्धा आणि कशाला
राहतील ती मोठं
मोठी ध्येय, असतो
तो फक्त ध्यास,
आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्याचा
ध्यास. ते तर
, आपल्या लाडक्या तुकोबाची पालखी
सजवून- धजवून, ना
ना फुलांनी आच्छादून, "ज्ञानोबा माऊली तुकाराम"
चा जयघोष करीत
आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यास
पंढरीला जात होते.
बाहेरच्या जगाचा गंधही
नसलेल्या अशा कित्येक
स्त्रिया ह्या हरिनामाचा
गोड गंध चौफेर पसरवीत
होत्या, ह्याची कदाचित त्यांनाही
कल्पना नसेल.किती
सामान्य होते त्यांचे
ज्ञान पण किती
असामान्य होती त्यांची
ती श्रद्धा.
एक
हातात तान्हे बाळ
आणि डोक्यावर तुळशी वृन्दावन
घेऊन अनवाणी निघालेल्या
एका माऊलीकडे पाहून
एक्दातर असेच वाटले
की श्री कृष्णाने
तर गोवर्धन
उचलला होता ही
माऊली तर संबंध
वृन्दावनच डोक्यावर घेऊन अनवाणी
चालत आहे .कान्हासाठी तर गोवर्धन
अगदी काडीतुल्य वजनाचा
होता पण ही
माऊली तर खांद्यावर
कुटुंबाची जबाबदारी असताना, कडेवर
तान्हे बाळ असताना
अनवाणी पायाने चालत होती,
तिचे कपाळ घामाने
चिंब भिजले होते
पण एवढ्यातही साडीचा
पदर सावरत तान्ह्या
बाळाला अगदी मायेने
कडेवर घेत आणि
तितक्याच प्रेमाने तुळशी वृन्दावानाला
हाताने सावरत ती, "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा
जयघोष करीत अगदी
उत्साहात पालखीमागून चालत होती.
त्यांच्यातील ती चैतन्याची लाट पाहून शेवटी एवढेच म्हणावे वाटते की,
धन्य तो विठुराया आणि धन्य त्याचे हे वारकरी.
आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे
।
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥
निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई ।
वानरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥
आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण।
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥
--- तुकारामाची
गाथा