Saturday 12 May 2018

तहान


‘‘जलं ददाति जीवनम्’’

रखरखत्या उन्हामध्ये भर दुपारी कोरडा पाचोळा पायाखाली तुडवत एखादा उंच पर्वत चढावा आणि कित्येक तासाची ती पर्वत चढाई केल्यानंतर जीभ कोरडी करू पाहणारी ती तहान लागावी.
दूर डोंगरावर कुठेतरी कडीकपारीत एखादा थंड पाण्याचा झरा गर्द झाडीच्या सावलीत सापडावा. दगडावरून वाहणारा तो झुळ झुळ पाण्याचा आवाज कानी पडावा.
गारवा देणारी ती थंडगार हवा श्वासातून थेट हृदयात शिरावी आणि  घामेजून गेलेला त्वचेचा रोम रोम प्रफुल्लित व्हावा.

गर्द झाडीच्या त्या थंडगार सावलीत त्या इवल्याश्या झुळ झुळ वाहणाऱ्या झऱ्याजवळ गुडघे वाकून बसावे.
शांतपणे दोन ओंजळी पाणी चेहऱयावर घ्यावे आणि काही एक क्षण फक्त स्तब्ध राहून त्या चेहऱ्यावरील पाण्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्यावा. 
मग हळूच तिसरी ओंजळ पाण्याने भरून घ्यावी आणि डोळे बंद करून ती ओठाजवळ धरावी, श्वास घेताना जाणवणारा तो मातीमिश्रित गंध, पहिला श्वास छातीत भरून घ्यावा तो त्या थंडावा देणाऱ्या गंधाचा, ओठांनी त्या पाण्याला स्पर्श करावे आणि असे वाटावे कि जणू, जणू जीभेआधी ओठच पाणी पिऊ पाहत आहेत. बेचव आणि कोरड्या पडलेल्या जिभेवर तो पाण्याचा प्रवाह असा खेळावा, जणूकाही वाफाळण्याऱ्या जबड्यामधील आग क्षणात शांत व्हावी आणि चारीही बाजूंना थंडावा पसरावा.
जिभेवरून वाहत जाणारा तो थंडगार प्रवाह जेव्हा घशात उतरावा तेव्हा असे वाटावे कि जणू थेट शिवजीच्या जटामधून गंगेचा पहिलाच प्रवाह पृथ्वीवर यावा नि स्मशानातील तो कैक युगापासून धगधगणारा विस्तव त्याने कायमचा विझवून टाकावा.

हेच ते पाणी, हेच ते अमृत, हेच ते जीवन.
जगातील सर्वात जुन्या विकसित संस्कृती, इजिप्तशियन संस्कृती (इ स पूर्व ३००० -५५०) आणि सिंधू संस्कृती (इ स पूर्व २५०० -१५००), दोन्ही संस्कृती मोठ्या नद्या काठीच विकसित झाल्या, जिथे वातावरणाचा संगम हा तंतोतंत जुळणारा होता म्हणजेच स्वच्छ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा.

घनदाट जंगले, वर्षावने आणि कित्येक नद्या असलेला तसेच मनुष्य प्रजातीचे उगमस्थान म्हणून प्रचलित असलेला आफ्रिका तितका प्रगत झाला नाही, पण त्याच आफ्रिकेतून वाहणारी नाईल नदी जेव्हा उजाड वाळवंटात प्रवेश करते आणि शेकडो मिल यानंतर वाहत जाते तेव्हा -
एक प्रगत अशी इजिप्तशियन संस्कृती पाहावयास मिळते, इजिप्तचे पिरॅमिड हे अद्भुत वास्तूचा कलाकारी नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहेतच.
म्हणतात ना एखाद्याला त्याचीच कदर असते जे त्याला अतिशय कठीण परिश्रमानंतर मिळते, नद्यांचे महत्व हे पटवणे तसे कठीणच पण आभार मानावे गुगल मॅप चे ज्यावर नाईल नदी घरबसल्या पाहावयास मिळते आणि पाहावयास मिळतो तो अभूतपूर्व चमत्कार. 

भर वाळवंटात तो शेकडो किलोमीटर रुंद पसरलेला हिरवागार पट्टा आणि तिथे आनंदाने फुलणारे ते जीवन.
खरेच किती अद्भुत ते दृश्य, गुगल मॅप वर दिसणारी ती नदी सरासरी 2 ते 4 किलोमीटर रुंद असेल पण आजूबाजूचा शेकडो किलोमीटरचा परिसर तिने हिरवागार करून सोडला आहे . आणि तिथेच पाण्याचे पूर्ण महत्व समजणारी अतिशय प्रगत इजिप्तशियन संस्कृती उदयास आली.
कदाचित हेच गमक भारताबाबत हि असेल, सर्वात मोठी नदी गंगा पण वाळवंटातून वाहिली ती सिंधू म्हणूनच सिंधू संस्कृती उदयास आली.

भरत राजाचे आर्य वंशज भारतीय गणले जाऊ लागले आणि भरत राजाचे राज्य हे भारत वर्षे म्हणून प्रसिद्ध झाले जे कि सिंधू प्रांतांसहित सर्वदूर पसरलेले होते. भाव, राग आणि ताल म्हणजेच भारत मध्ये रुची ठेवणारी आणि त्यात निष्णात असणारी अशी हि अतिशय प्रगत भारतीय संस्कृती ह्या सिंधू खोऱ्यामध्ये तर विकसित झाली.
सिंधू संस्कृती हि सिंधू नदीच्या काठी विकसित झाली आणि पाण्याच्या शोधात आलेल्या फारशी लोकांनी फारशी भाषेत “सिंधू” (هندو) असे लिहले मात्र फारशी शब्दात आणि उच्चारात तिचा उच्चार हा “सिंहदू” असा निघाला आणि कालांतराने स निघून तो “हिंदू” असा झाला,
मग सिंधू प्रांत हा हिंदूस्थान असा भाष्यांतरित झाला. उदार मनाच्या सिंधू प्रदेशातील विकसित भारतीय लोकांनी हिंदूस्थान हे हि नाव गौरवपूर्वक स्वीकारले. 
कालांतराने व्यापारानिमित्त आलेल्या ग्रीक लोकांनी हिंदू नदीला त्यांच्या उच्चारात इंदू नदी म्हणजेच इंदूस असे संबोधले कालांतराने त्यांच्या अक्षरात इंदूस रिव्हर हि इंडस रिव्हर झाली आणि हिंदुस्थान हा “ινδουάν” (indouán) इंदूयान तर स्पॅनिश भाषेत (indua) “इन्दूयां” कालांतराने इंग्रजीत तो इंडिया (India) असा झाला. इंग्रजांच्या जगभर वसाहती पसरलेल्या असल्यामुळे पुढे सिंधप्रांत हा इंडिया म्हणून प्रचलित झाला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी कि "इंडिया" "हिंदुस्थान" अशी वेगवेगळी नावे ज्या प्रांताला मिळाली ती फक्त त्याच्याकडे असलेल्या भरगोस पाण्यामुळे, थोडक्यात सिंधू नदीच्या वैभवामुळे, शेकडो वर्षांपूर्वी इंडिया व हिंदुस्तानची ओळख हि फक्त आणि फक्त पाण्याचा मुबलक साठा हि होती, "सोने कि चिडिया" च्या कित्येक शेकडो वर्ष आधी "पाणी का धन" म्हणून भारत प्रसिद्ध होता.


लाजिलवानी गोष्ट अशी कि, आज घडीला पाणी टंचाई, दूषित पाणी, दुष्काळ असे हाल सर्वात जास्त इथेच पाहायला मिळतात.
बाराबलुतेदारांमध्ये सर्वात समृद्ध असणारा आणि सर्व देशाला पोसणारा बळीराजा आज सरकारी विमा आणि अनुदान मागून जगतो आहे. एकेकाळचा सर्वात समृद्ध असा बलुतेदार आज, पाऊस नाही म्हणून रडतो आहे.
शहरी भागातील पांढापेशी लोकांना तर पाण्याचे महत्व समजावणे अतिशय कठीणच.
पाणी आणि त्याचा वापर हा काही दररोज 500 लिटर ची टाकी आणि फ्रिज मध्ये बाटली भरून ठेवण्याइतका एवढाच मर्यादित नसतो .
शहरी भागात वाढलेल्या पांढरपेशी मनाला इतकेच ते पाणी समजते आणि ते नाही भेटले कि जाणवते ती पाणी टंचाई.
जमिनीत मुरलेले पाणी हे अजब जादूगिरी करीत असते, हिरव्यागार गवताची ती चादर आणि आणि शेकडो जीव जंतूंना अभयदान ते देते आणि तोच निसर्ग हा नैसर्गिक असतो आणि त्या खुल्या मोकळ्या पोषक खेळीमेळीच्या वातावरणात उपजलेले अन्नधान्य हेच खरे पौष्टिक असते, जे शरीलालच नव्हे तर आत्म्याला पण थंडावा देते. 
कदाचित विज्ञानाचा शोध शेकडो वर्षांपूर्वी लागला नसता तर वाळवंटातून वाहणारी ती नाईल नदी कदाचित घरबसल्या पाहता आली नसती, गृह ताऱ्यांचे रहस्य कधी समजलेच नसते (जे आताही समजणे कठीणच), जग फिरता आले नसते, विविध कल्पनांनी बहरलेले चित्रपट पाहता आले नसते, कदाचित ज्याच्यात जीव अडकला आहे ते वायफाय आणि इंटरनेट वापरताच आले नसते, पण का को जाणे कदाचित ह्या सर्वांची गरजही पडली नसती, कुठेतरी एखाद्या घनदाट जंगलात नदी काठी एखाद्या गलेलठ्ठ झाडाच्या फांदीवर बसून मी आरामात आंबे नि द्राक्षे खात असलो असतो…. असो .
तहानलेल्याला पाणी पाजवण्याचे पुण्य आणि यासारखे श्रेष्ठ दान हे कोणतेच नाही.
अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने पळू पाहणाऱ्या ह्या स्पर्धात्मक जगाला मी आजपर्यंत मांजरीच्या डोळ्याने बघत आलो, व्हाट्सअँप वर फक्त काळी टिक्स निळी करीत राहिलो. बाकी माझ्या विश्वापलीकडे कधी काही लिहले नाही.
आज लिहावेसे वाटते, आणि आज बोलावेसे हि वाटते,
सत्यमेव जयतेने राबवलेल्या पाणी फौंडेशन स्पर्धेनिमित्त …
भेगांच्या रूपात तुकडे होऊन विरक्त होऊ पाहणाऱ्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर, पाण्याच्या ओलाव्याने माती नि नाती घट्ट करू पाहणाऱ्या ह्या पाणी फौंडेशनचा मी अत्यंत अगदी हृदयापासून समर्थन करतो.
कुठल्याही सामाजिक कार्यापेक्षा मनुष्याकडून दिलेली निसर्गाला निव्वळ भेट म्हणजे हि पाणी फौंडेशन स्पर्धा होय, आजतागायत करोडो रुपये ना ना योजनेत सरकारने आणि कित्येय स्वयंसेवी संस्थेने खर्च केले असतील पण मनुष्याने मनुष्यासाठीच नव्हे तर निसर्गासाठी दिलेली निव्वळ भेट म्हणजे हि पाणी फौंडेशन यौजना होय.

सिव्हिल इंजियनीयरिंगचे किचकट गणिते आणि पाणलोटाच्या पद्धती अत्यंत सध्या भाषेत सांगणारे ते चतुरराव आणि चतुराताई हि कल्पनाच मुळी भन्नाट वाटली. कुठल्याहि पूर्व कौशल्यविना, अगदी १०-१५ मिनिटाचा व्हिडीओ पाहून हैड्रोमार्कर ते कंटूर रेषा आखण्याचा पद्धती अगदी शाळेतील मुलाला सुद्धा समजेल एवढी ती सोपी पद्धत.
गॅबियन पासूनते अगदी वॉटरशेड पर्यंत पाणी संवर्धनाच्या विविध पद्धती रीतसर रित्या मांडल्या गेल्या आहेत. अशा कल्पकतेला दुजोरा नि मदत करणारे जीव हे नक्कीच अगदी शांत मानाने त्यांचा देह त्यागतील, भलेही सांसारिक जीवनात ते कितीही ओरबाडले गेले असू पण काही वर्षात दूरवर पसरलेली हिरवळ पाहून नक्कीच त्यांचा आत्मा समाधानी होईल.
हेच तर निव्वळ गणित आहे जीवनचक्राचे, निसर्ग संवर्धनासाठी केलेले श्रमदान भलेही ते व्यक्तिगत स्वार्थासाठी केलेले असू पण ते नकळत नक्कीच समाधानी बनवेल, चिडचिडेपणा आणि नकारात्मक विचारांना दूर सारेल, अहंकार क्रूरता आणि युद्ध यासारख्या भावनांना पुसून टाकेल, आणि मग अनेक दशकानंतर जे काही उगवेल ती असेल एक अतुलनीय, शांत, सभ्य, समृद्ध आणि अतिशय विकसित संस्कृती.
संवर्धनासाठी झटणाऱ्या अशा सर्व देवदूतांना माझा मनाचा मुजरा …



गजानन व्यंकटराव मुंडकर 
(बी इ इलेक्ट्रिकल)
(लातूर)


No comments:

Post a Comment