महादेवा आज रात्रीच तू तांडव केले होते . तुला ना आदी ना अंत मग हा प्रकट दिन तरी कसा म्हणायचा.
हजारो लोकांची गर्दी आहे तुझ्या दर्शनाला, भलीमोठी रांग प्रत्येक तुझ्या मंदिरात आज.
मी कुठेच नाही ह्या गर्दीत, काय हि परिस्थिती माझी. तू खरेच आहेस कि नाहीस याची मला परिपूर्ण कल्पना नाही. गर्दीत फिरतोय मी गर्दीचा भाग असून नसल्यासारखा ;एकांतात रहातोय मी ,पण सगळ्या जगभरच्या जिवंत घडामोडी पाहत.
असा कसा हा विरोधाभास माझ्या जीवनात -जीवन हेच मुळी विरोधाभासिक आहे.
आणि जग
हे तुझ्या अधीन असूनही तू एक वैरागी
म्हणून ओळखला जातोस किती विरोधाभास आहे
हा.
आणि मी ज्याने कधीही कुठली तिथी किंवा वार पाळलेला नाही, कि कुठला उपवास कुठला उत्सव मी असा वेगळा साजरा करीत नाही तरी का मी तुला अगदी गृहीत धरतो कि मी अगदी तुझ्या जवळ आहेस.
माझी हि मूर्ख कल्पना असेल.
पण का असे वाटते कि ह्या गोष्टी खरेच महत्वाच्या नाहीत तुला जाणून घ्यायला लोक बघतात, त्यांना काय हवे ; पण कोणी हे पाहत नाही तुला काय हवे
अगदी सोपे गणित आहे ; परस्पर अवलंबी हे जीवन आहे, पर्यावरण प्रकृती पुरुष सूक्ष्म जीव हे सर्वे परस्पर अवलंबी आहेत. मग का हे जग ज्या गोष्टी मुळात गरजेच्या नाहीत, त्या गोष्टी मागे व्यर्थ ताकत वाया घालवते.
वाटते ५००० वर्षांपूर्वी कुठेतरी चूक झाली असावी , बॅबीलॉन च्या अगदी आधी जेव्हा मनुष्य हा शेती आणि घर करून राहायला लागला. धातूचा आणि चाकाचा शोध लागला आणि परस्पर अवलंबी ह्या नियमाचा विसर पडत गेला.
मनुष्याच्या संगतीत राहणाऱ्या पशु पक्षी आणि वनस्पतीचे देखील फायदे झाले.
वाघ सिंहाचे काय? गेंडे पाणघोडे यांचे काय? अशा किती प्रजाती लुप्त झाल्या ज्या गरजेच्या होत्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी.
जिथे वाघाचा जन्म मिळायचा तिथे मांजराचा मिळतोय ,जिथे पिंपळाचे झाड व्हायचे
तिथे
८० % लोक हे दुस्यासाठी जगतात , नको असून जगतात कारण मरणाला घाबरतात.
मृत्यू
तर अंतिम सत्य आहे.
मग का हा दुखावा रुसवा फुगवा ? कुठल्याही प्राण्याला तो कसा जन्माला आला आणि कसा मरण पावला समजत नाही. मनुष्य मात्र प्रत्येक वेळी मरण पाहत असतो, त्रासही मरणापेक्षा जास्त सहन करतो. काही मुक्ती साठी याचना करतात बऱ्याच जणांना तर हे पण ठाऊक नसते कि मुक्ती ची याचना करावी. ते फक्त आजची वेळ टाळून आनंद परत यावा एवढेच इच्छिता.
लोकांची श्रद्धा म्हणजे तू आहेस आणि गरज हि आहे ह्या समाजाला तुझ्या अस्तित्वाची, नाहीतर स्वतःच्या मर्जीने वागून हाहाकार मजला असता ; पण मनुष्याचा व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या प्राण्याने तुझी भक्ती उपासना किंवा पूजा केली मला दिसत नाही .कदाचित ह्या गोष्टींचा तुला फरक पडत नसेल, मनुष्य स्वतःचा विश्वास अबाधित राहावा केलेल्या पापाचा पच्छाताप म्हणून करत असेल हे.
श्रद्धेच्या पलीकडेही तू कुठेतरी आहेस.
मी तुला शोधतोय ;
सागरच्या पाण्यातील मिठासारखा आहेस, खारटपणात जाणवतोस खरा पण दिसत नाहीस; कदाचित कधी दिसणारही नाहीस.
त्यामुळे कदाचित तुला तू सगळ्यामध्ये असूनही निराकार आहेस असे म्हटले जाते. ह्या प्रकृती सोबतच तुझा जन्म झाला; प्रक्रितेने तुला बनवले आणि तू प्रकृतीला बनवले.
दोघेही अवलंबून
आहेत; एकाच वेळी उदयाला आलेले.
तू तुझे काम करतोस -
सर्व जीवांमध्ये धागा गुंतल्यासारखा ,धाग्याशिवाय मोती एकत्र नाही राहू शकत;आणि मोत्याशिवाय धागा आकार नाही घेऊ शकत, ज्या मोतीने स्वतःमधला धागा ओळखला तो बुद्ध झाला. अंध भक्तांनी तुला जाणलेच नाही कधी.
कवींनी तर कधी शायर लोकांनी तुला बऱ्याचता जाणले, लिहलेही. पण ते हि अस्पष्ट आणि कोड्यात , कारण असाच तर तू आहेस
हा संभ्रम कधी दूरही होणार नाही
, असाच तर तू दुहेरी
आहेस .
वाळू प्रमाणे आहेस , मूठ आवळली तरीही निसटतो आणि मूठ नाही आवळली तरीही. मुळात जे हातात ते तू नाहीस. हातातून निसटणारी वाळू जी ना जमिनीवर आहे ना हातात, हवेच्या संपर्कात विखुरलेली ,तो गुणधर्म म्हणजेच तू आहेस.
नदीतल्या पाण्यात तू दिसत नाहीस आणि ओंजळीतल्या पाण्यात पण.
पण अर्घ्य अर्पण करताना जी धार असते आणि त्यात सूर्य चमकतो म्हणजे तू,
म्हणून तर तू सर्वत्र आहेस आणि नाहीस पण, अशी वाख्या केली जाते.
गजानन मुंडकर