Sunday 13 June 2021

संध्याकाळ (लॉकडाऊन नंतरची 2021) - 2






१३ जून, रविवार बराच उशीर झाला होता. बसून बसून पाय जाम आखडले होते. अंदाजाने ९:३० वाजले असतील रात्रीचे. बाहेर पाऊसही नव्हता, वर्षभर तसेच पडलेले ड्रॉवर मधील हेडफोन काढले, ब्लूटूथ स्टार्ट केला, काही सेकंदातच कनेक्ट झाले, बॅटरी हि ६०% होती. फार आश्चर्य वाटले आणि टेक्नॉलॉजि विकसित होत आहे याचा आनंदही झाला.ऍमेझॉन म्युजिक स्टार्ट केले, पहिलेच गाणे डिसपॅसितो होते. कित्येक वेळा ऐकले असेल मी, गाण्यातला काही एक शब्द कळत नव्हता, पण गाणे असे काही एकदम मूड बनवणारे होते. ४ एक वर्षांपूर्वी, म्युजिक ब्लूटूथ ने ऐकायचे म्हणजे किमान १० एक मिनिट जायचे, फोन आणि हेडफोन कित्येक वेळा रिस्टार्ट करायचो.

विचाराच्या धुंदीत गेट बाहेर कधी आलो समजलेच नाही. ९० च्या दशकातील एक म्हण आठवली. माणसाला भरपूर काही हौस करायची इच्छा असते पण त्या वेळी त्याच्याकडे पैसा नसतो, आणि जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो तोपर्यंत वय हे भरपूर होऊन गेलेले असते. आज इन्स्टंट लोण आणि नो कॉस्ट ईएमआय सारख्या गोष्टीनी जीवन खरेच सुलभ केलेले आहे. जो पैसा तुम्हाला ५ एक वर्षानंतर मिळणार होता तो तुम्ही आता वापरू शकता थोडक्यात काय तर तुम्ही भविष्यच विकत घेताय. पूर्वी लोण प्रकरण एवढे सोपे नव्हते. डिस्काउंट आणि ऑफर हि  नव्हत्या. जेव्हापासून  ग्राहक हाच प्रॉडक्ट झालाय तेव्हापासून सगळ्यांचीच चांदी झालीय.

दिवार, शोले, अशा मुव्ही माधली खडतर जीवन आता तरी दिसत नाही. उपाशी राहून कोणी जीव सोडला, आखरी बची हुई रोटी साठी कोणी खून केला असा प्रकार आजच्या सिनेमा मध्ये दिसत नाही. बाकी पाहण्याचा दृष्टीकोन..

तंत्रज्ञाचा कुठलाच असा परिणाम मला जाणवत नाही कि ज्यामुळे जीवन खडतर झाले असेल. ऍनिमल प्लॅनेट वरील प्राण्यांचे जीवन बघता माणसाचे जीवन हे बरेच सुसह्य आहे. पण उगाच दुसऱ्याशी तुलना आणि पैशाच्या हवासापोटी माणूस हा जीवनातील रस पाहू शकत नाही. परवाच भेटलेली एक मैत्रीण, आजकाल वर्षाला एक करोड म्हणजे सुद्धा जास्त नाहीत म्हणणारी, तिला ह्या गोष्टी समजून सांगणे मला तरी शक्य नव्हते.

स्पर्धेमुळे प्रगती होते, स्पर्धा  हि नक्की असावी, पण ती जीवघेणी नसावी. एखादेवेळी मरताना जेवढा त्रास होणार नाही, एवढा त्रास हि स्पर्धा देऊन जाते.

कुठेतरी ह्या स्पर्धेला अंकुश लागणे महत्वाचा होते, आणि ते तसे झालेही. ह्यानंतरचे जग हे नक्कीच वेगळे असणार, अधिक स्तिरावलेले, अधिक शांत आणि अधिक कार्यक्षम..


तरीही एका विशिष्ट चौकटीत चालणाऱ्या ह्या जगाला जीवनाचा आनंद काय हेच समजावणे अवघड आहे. उगाच भविष्यात कुठेतरी चमत्कार होईल आणि स्वर्ग गवसेल, असा विचार करणारे हे जग, आपण प्रत्यक्षात एका स्वर्गातच जगतो हेच मुळी विसरून जाते. खरे पाहता किती अकल्पनीय आहे हे, ब्रम्हांडाच्या एवढ्या मोठ्या विस्तारात पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती होणे, हा काय कमी चमत्कार आहे, किती अनाकनीय, अकल्पित गोष्टी आहेत, टीव्ही , इंटरनेट, स्मार्ट फोन, हे काय कल्पना आणि चमत्कारापेक्षा थोडेच कमी आहे. 

आज बराच चाललो जवळपास ६ एक किलोमीटर चाललो असेन, पाय हि जाम थकून गेलेत, शरीरासोबत आज मनही हलके झाले, रात्रीचे अकरा वाजत आहेत, घरासमोरील खाटेवर चार पोरं PUBG खेळताना वगळता, रोडवरची कुत्रीही झोपली आहेत. असो...

स्वतःहून स्वतःलाच वेळेच्या बंधनात गुरफुटून टाकलेल्या सध्याच्या माणसाची अवस्था हि एका जंगलातील वाघाप्रमाणे झाली आहे ज्याने स्वतःलाच गुहेत कैद करून घेतले आहे. विशाल जंगल त्याच्यासमोर विखुरलेले आहे, पण गुहेची चौकट ओलांडायची त्याची हिम्मत नाहीये. 


 


गजानन मुंडकर (पुणे )

No comments:

Post a Comment