Thursday 10 June 2021

संध्याकाळ (लॉकडाऊन नंतरची 2021)

 





१०जूनची संध्याकाळ आज थोडा लवकरच मोकळा झालो. उद्या शुक्रवार सुट्टी असल्यामुळे आज थोडा रिलॅक्स हि होतो. बाहेर फेरफटका तरी मारून यावा अशी इच्छा झाली. बरेच महिने उलटले असतील कधी संध्याकाळचा वॉक घेऊन. ६ जून नंतर बरीच नियम हि शिथिल करण्यात आली होती. टीव्ही बंद केला फोन आणि चावी घेऊन तसाच बाहेर पडलो. सात एक वाजले असतील, सेक्युरिटीशी नजरा नजर झाली, सवयीप्रमाणे कुठे?? असा त्याने अविर्भाव आणला, नंतर ओशाळला. आणि रजिस्टर वर सही न करता तसाच मी बाहेर पडलो.  काहीतरी बदल्यासारखं वाट्लं. ३- ४ मुलांचा ग्रुप भरधाव वेगाने रस्त्यावरून पळताना दिसला. जणू जेल मधून नुकतीच काय ते सुटले असतील. स्वतःला अजमु पाहत होती, त्यांच्यातील हातवारे आणि खिदळतानाचा आवाज जणू काही ते स्वतंत्र भारतात परतले कि काय असे वाटत होते. मलाही काही वेळ लागला, थंडगार हवा थोडी बोचरी जाणवत होती.माझा श्वासाचा वेगही वाढत होता, जणू काही छाती शक्य तेवढी हवा आत घेऊ पाहत होती. त्या अंधारात माझे डोळे स्थिरावण्याचा प्रयत्न करीत होते, डोळ्यांची जळ जळ कमी होत होती. कोरड्या डोळ्यामध्ये जणू ओलसरपणा येत होता.रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली पिंपळाची झाडे जणू वाऱ्यासोबत सोबत वादन करत होते. 

क्षण एक वाटले काहीतरी बदलेले आहे, पण काय ते समजत नव्हते. जसा पुढच्या वळणावर आलो तसे नेहमी बंद असणारे घराचे दरवाजे आज सर्रास उघडे होते, त्यात हॉल मध्ये असणारे मोठाले टीव्ही रोडवरूनही स्पष्ट दिसत होते. समोरच एक घरगुती ब्युटी पार्लर होते , अंगणातल्या त्या झोपाळ्यावर दोन मैत्रिणी मस्त गप्पा मारत होत्या. पुढच्या वळणाला खांबावरची लाईट बंद पडली होती काही दिसतच नव्हते, फोनचा चा फ्लॅश चालू करायचा  विचार करत होतो तोच रोडवरची कुत्री ओरड्याला लागली, त्याबरोबर लगेच गेट च्या बाहेर तोंड काढून भुंकणारी २-४ कुत्री मला दिसली, जी कित्येक दिवसापासून गायब होती, आसपासच्या अपार्टमेंट मधूनही भुंकण्याचा आवाज आला. काहीतरी बदलत होते. पण नक्की काय समजत नव्हते.

एव्हाना श्वास पूर्णपणे मोकळा झाला होता. समोरचा २०० एक मीटर चा रोड हा प्रशस्त रोड जणू स्ट्रीट लाईट खाली लखलखाटत होता, धूळखात पडलेल्या  रस्त्याच्या शेजारच्या गाड्या काही दिसत नव्हत्या. तो आल्हादायक वारा आता जणू ओळखीचा वाटत होता. पुढल्या कॉर्नर ला येतो ना येतो तोच मंदिराची घंटा कानावर पडली. संध्याकाळची आरती चालू होती. कोणी एक आजी दिवा लावत होती तर तिची नात घंटानाद  करत होती. 

त्या छोट्याश्या जागेतील ते इवलेशे गोंडस मंदिर, असा अनुभव नक्कीच मागच्या जन्मीचा वाटत होता. पुढचा अर्धा एक किलोमीटरचा रास्ता हा सरळ होता, हार्डवेअर ची, पेंटची,  किराणा दुकाने, सारे काही बंद होते, इव्हनिंग वॉक साठी आलेली १-२ नजरेस पडले, रस्ताच्या दोन्ही बाजूंना झाडांच्या पानांची सळसळ अशी धून ऐकू येत होती, त्या आवाजात गुंतत होतो तोवर दर्र्र्रर्र  आवाज करत एक ऍक्टिवा भर्रकन निघून गेली, मागे वळून पहिले तर झोमॅटो चा लाल रंगाचा टीशर्ट घातलेला दिसला. त्याविचारात चालत पुढे निघून गेलो हे कळलेच नाही. समोरच शेजारी असणाऱ्या दोन दुकानाच्या आत छोटासा जाळ दिसला, ओळखीचा वाटत होता पण त्या अंधारात उमजत नव्हता.

 कित्येक दिवस बंद असलेली चहाची ती छोटी टपरी आज चालू होती. आपल्या मोपेड, स्टॅण्डवर लावून ३ एक जण कॉलेज ची पोरं चहा आणि सिगारेट ची झुरके घेत होती. लांबून आलेली वाटत होती कित्येक दिवसानंतर भेटत असावीत, त्यामुळेच मेन रोड वरून आत आली होती. 

पुढच्या वाळणानंतर , साधारण अर्धा एक किलोमीटर नंतर पुणे एअरपोर्ट रोड होता. त्या कोपऱ्याला आलिशान मेडिकल स्टोर होते, आता ते जनरल स्टोअर झाले होते. लॉकडाऊन च्या कित्येक रात्री इथे कार घेऊन मास्क घालून यायचो मी, कधी कधी पोलीस हि भेटायचे. असो..

पुढच्या वळणावर आलो तोच निवडुंगाचे एक भले मोठे दांडके चक्क रोड वर आले होते, अंदाजे ६ एक फूट लांब आणि 5 एक इंच रुंद एवढे मोठे होते ते, रस्त्यालगतच्या घराच्या बागेच्या जाळीतून चक्क रस्त्यावर आले होते, निवडुंग एवढा मोठा असतो हे पहिल्यांदाच समजले, बहुदा मॉर्निंग वॉक बंद होता म्हणून एवढे वाढले हे, नाहीतर रामदेव बाबाच्या भक्तांनी त्याला सकाळीच संपवला असता. 

२ एक मुली आणि त्यांचा जर्मन शेफर्ड वगळता रस्त्यावर कोणी एक दिसत नव्हते. वाऱ्याची झुळ झुळ , हवेतील गारवा जणू काही गुदगुल्या करत होता, सहज फोन वर नजर टाकली साडेसात वाजले होते, तिला सहजच " hi" पाठवला. ती ऑफिसच्या कामात गुंतलेली असणार.  " आय अँम स्टील वर्किंग"  तिचा रिप्लाय आला. 

ती डिप्लॉयमेंट मध्ये व्यस्त होती मागच्या २ दिवसापासून, म्हणून जास्त काही बोलायचे टाळले, उगाच चवताळलेल्या वाघाच्या घशात हात घालण्यात काही अर्थ नव्हता. तसाच मेडिकल जवळ पोचलो, दुकानाच्या बाहेरच त्याच्या फ्रीझर मध्ये डोकावून पहिले, भरमसाठ कुल्फी आणून ठेवल्या होत्या त्याने. बोला सर, कुठली देऊ गुलकंद, मावा कि मँगो. नेहमी स्टोरीया कोकोनट वॉटर पिणारा मी, आज त्यानेही माझा मूड ओळखला, एक गुलकंदाची मस्त गुलाबी रंगाची कुल्फी घेतली, बाहेर चिकटवलेला कोड स्कॅन केला, आतून पेटीएम पे प्राप्त हो गये असा स्पीकर मधून आवाज आला, त्याबरोबर तसाच बाहेरच्या बाहेर माघारी फिरलो. कुल्फीचा तो स्वाद, आणि तो थंडगार झुळझुळणाऱ्या हवेतील गारवा, असा तो इव्हनिंग वॉक, जीवनभर लक्षात राहण्यासारखा होता.


गजानन मुंडकर (पुणे )

No comments:

Post a Comment